माकपची स्थापना ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९६४ या दरम्यान कलकत्ता येथे झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ७व्या कॉंग्रेसमध्ये झाली. माकप जन्माला आला तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कम्युनिस्ट चळवळीतील दुरूस्तीवाद आणि पंथवाद याविरुद्ध लढण्यासाठी, मार्क्सवाद-लेनिनवादाच्या शास्त्रीय तत्त्वांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या भारताच्या परिस्थितीतील ठोस अंमलबजावणीसाठी. साम्राज्यवादविरोधी लढा आणि १९२० साली स्थापन झालेल्या संयुक्त कम्युनिस्ट पक्षाचा क्रांतीकारी वारसा यांचा लढाऊ मिलाफ म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. गेल्या काही वर्षात माकप ही देशातली आघाडीची डावी शक्ती म्हणून पुढे आली आहे.
१९६४मध्ये स्थापना झाल्यापासून माकपची सतत वाढ होत आली आहे. स्थापनेच्या वेळी पक्षाची सदस्य संख्या होती १,१८,६८३. ती २०१३ साली झाली होती १०,६५,४०६. पक्ष मार्क्सवाद-लेनिनवादाची भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र अंमलबजावणी करत आला असून जनतेची लोकशाही क्रांती यशस्वी करण्यासाठी रणनीती आणि डावपेच आखत आहे. जनतेची लोकशाही क्रांतीच केवळ भारतीय जनतेचे जीवन अमूलाग्र बदलू शकते, अशी पक्षाची निष्ठा आहे. साम्राज्यवादी, बडे भांडवलदार आणि जमीनदार वर्गांच्या शोषणाचा अंत करण्याचा कार्यक्रम राबवून हे मूलभूत परिवर्तन पक्ष घडवू पहातो आहे. अस्तित्वात असलेल्या भांडवली-जमीनदारी धोरणांना खरा पर्याय देण्यासाठी डावी आणि लोकशाही आघाडी बांधण्यासाठी देशातील आघाडीची डावी शक्ती म्हणून माकप कटिबद्ध आहे.
गेल्या काही निवडणुकात माकप देशात सरासरी १५ टक्के जागा लढवत आला आहे. आणि त्याला ५-६ टक्के मते मिळत आली आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत माकपने ९ जागा जिंकल्या. राज्यसभेतही माकपचे ९ सदस्य आहेत.
आज देशात माकप त्रिपुरा या एका राज्यात सत्तेवर आहे. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे सरकार प. बंगालमध्ये १९७७ पासून २०११ पर्यंत सलग सत्तेवर होते. केरळमध्ये ते वारंवार सत्तेत येत असते. तेथे सध्या माकपच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी प्रमुख विरोधी राजकीय आघाडी आहे. त्रिपुरात माकप प्रथम सत्तेत आला तो १९७७ मध्ये. पुढील निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने पक्ष निवडणूक हरला खरे. पण नंतर १९८८ पासून झालेल्या सर्व निवडणुकात पक्ष विजयी झाला आहे. देशात पक्षाची वाढ असमान असली तरी माकप ८ राज्यांच्या विधानसभात प्रतिनिधित्व करतो आहे.