पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच युनोच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टनला भेट दिली. आपल्या पी टी आय या सरकारी वृत्तसंस्थेनेच या भेटीच्या निमित्ताने मोदींना “रॉकस्टार” म्हणून गौरवले. रॉकस्टार हा अमेिरकन संस्कृतीत गौरवायचा शब्द शोभून दिसतो. दिवसरात्र “देशीवादाचा” जप करणाऱ्या संघिष्टांना हा शब्द पचेल की नाही, कुणास ठाऊक? आज तरी ते फिल्मी ष्टाईलने आरत्या म्हणायच्या थाटात पॉप ष्टाईलमध्ये नमो नमो म्हणत आहेत. भारतीय देवांचा जप “हरे कृष्ण, हरे रामा” म्हणत अमेरिकन “रॉक” करत आलेले आहेतच. हिमालयातल्या साधूंचा गांजा आणि मायामीच्या बीचवरच्या हिप्पींचा चरस यांचे अध्यात्मिक “ग्लोबलायझेशन” होऊन जवळ जवळ भारताच्या स्वातंत्र्याइतकीच वर्षे उलटली आहेत. तेव्हा पंतप्रधानांचा “रॉकस्टार” म्हणून गौरव होण्यात हिंदु अध्यात्माचे दूध पिळत रहाणाऱ्यांना गैर वाटायचे काहीच कारण नाही. जिथे कुठे असतील तिथे हिटलर आणि गोळवलकर मांडीला मांडी लावून पवित्र जलप्राशन करत असणार. जन्नतमधल्या उमर खय्यामला दूरवरून (जवळ जायचे? “अब्रह्मण्यम्, अब्रह्मण्यम्”) “हाय कंबख्त, तू पाणी पियाच नही” म्हणत वाकुल्या दाखवत असणार. दोघेही म्हणत असतील, “इंडियन गव्हर्नमेंट्स जर्नॅलिझम हॅज कम ऑफ एज.”
तर आमचे पंतप्रधान एकदम रॉकस्टार बनले. रॉकस्टार कुणाला म्हणतात? पाश्चात्य देशात, विशेषत: अमेरिकेत, संगीताचे बॅंड खूप प्रसिद्ध आहेत. त्यातला जो प्रमुख बॅंडवाला असतो, त्याला.
तर न्यू यॉर्कच्या सेन्ट्रल पार्कमध्ये बॅंडचा आणि मोदींच्या भाषणाचा हंगामा झाला. सेन्ट्रल पार्कमधला संगिताचा हंगामा हा युनोच्या सभेसाठी नित्याचाच असतो. ती संधी साधून मोदींच्या इव्हेन्ट मॅनेजर्सनी त्यांचे भाषण आयोजित करायची चलाखी दाखवली. पण त्यातून एक स्वच्छ दिसून आले. त्यांच्या डोक्यातून निवडणुकीचा हॅंग ओव्हर काही अजून गेलेला नाही. त्या हॅंग ओव्हरचे दर्शन लाल किल्ल्याच्या तटावरून केलेल्या भाषणात दिसले होतेच. सत्तेची नशा और असते, म्हणतात ते उगाच नाही. बहुमताचा डोस जास्त झाल्यावर तसे होणार, यात काय नवल? खरे तर या रॉकस्टार पंतप्रधानांना कुणी तरी नम्रपणे सुचवायला हवे, “निवडणूक झालीय. आता कामाचे दिवस आहेत.” पण हा रॉकस्टार स्वत:च्याच बोलण्यावर जाम खूश आहे. आणि बोलायचे थांबतच नाही. आधी टोकियो आणि आता न्यू यॉर्क. झाडूचे नाटक किती दिवस पुरणार? लोक विचारतायत, मूळ कामाचे काय?
मोदीभक्तांच्या हे बहुतेक ध्यानात आले असावे. आणि म्हणून पंतप्रधानांच्या ३ ऑक्टोबर रोजी व्हायच्या भाषणाच्या सरकारी जाहिरातींचा पाऊस वर्तमानपत्रांतून पाडायला सुरवात केली आहे. नाव गांधीजयंतीचे पण मुहूर्त निवडलाय दसऱ्याचा. संघिष्ट लोक अत्यंत धूर्त आहेत. त्यांच्या नागपूरमधल्या संचलनाचा मुहूर्त हाच असतो. सरसंघचालक नागपूरला देशाशी संवाद साधतात, तो त्यांच्या “लाठीधारी” स्वयंसेवकांच्या माध्यमातून. रॉकस्टार मोदी साधणार आहेत, दूरदर्शन आणि रेडिओच्या माध्यमातून. या इव्हेन्टचा नेमका संदेश काय आहे? सरसंघचालकांचं भाषण सांस्कृतिक असतं. मोदींचं भाषण राजकीय असणार. एकाच मुहूर्तावर. मोदी सरसंघचालकांना बगल देऊन त्यांची जागा तर घेऊ पहात नाहीत?
दरम्यानच्या काळात भारतीय रॉकस्टार आणि अमेरिकन काऊबॉय यांच्यात विविध करार झाले. जागतिक स्तरावरील सामरिक भागीदारी एकूण आठ संयुक्त करारांचा कणा असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे करार आहेत – आरोग्य सहकार्य, सामरिक सल्ला मसलत, विकास कार्यक्रम सहकार्य, संरक्षणविषयक भागीदारी, नागरी अवकाश आणि तंत्रज्ञान सहकार्य, महिला सबलीकरण, ऊर्जा आणि हवामान बदल आणि सांस्कृतिक भागीदारी.
वस्तुत: या संदर्भात आधीच असलेल्या करारांच्या आशयात फारशी नवी भर मोदी–ओबामांच्या या भेटीत पडलेली नाही. पण एक धागा मात्र दोन्ही देशांना झाकता आलेला नाही. तो आहे, भारताला अमेरिकेच्या जागतिक हितसंबंधाच्या विळख्यात ओढण्याचा. अमेरिकन सरकारचे राजकीय उपसचीव निकोलस बर्न्स यांच्या २८ सप्टेंबरच्या वॉशिंग्टन पोस्टमधील लेखात हे स्पष्ट झाले आहे. “सामरिक हितसंबंधाच्या बाबतीत अमेरिकेसाठी भारत हा जगातल्या मोजक्या देशांपैकी एक आहे. हिंदी महासागरात चीनचा प्रभाव रोखण्यासाठी जपान आणि भारत हे अमेरिकेचे दोन महत्त्वाचे भागीदार आहेत.” शीतयुद्ध संपल्यानंतर “चीनला रोखणे” हे आपले जगातले सर्वात महत्त्वाचे सामरिक उद्दिष्ट असल्याचे अमेरिका वारंवार अधिकृतपणे सांगत आला आहे. आणि मोदींनी ओबामांच्या सुरात सूर मिसळला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या मतानुसार, “वॉशिंग्टनसोबत संबंध पुनर्स्थापित करणे, ही भारतीय पंतप्रधांनाची महत्त्वाकांक्षा आहे.”
मोदी–ओबामांनी आपल्या वॉशिंग्टन पोस्टच्या संयुक्त संपादकियात हेच उद्दिष्ट अधोरेखित केले आहे. त्या संपादकियाचे शीर्षक आहे, “चलें साथ साथ: फॉरवर्ड टुगेदर वुई गो“. यातील हिंदी शब्द आहेत मार्टिन ल्यूथर किंगच्या “वुई शाल ओव्हरकम“च्या भाषांतराशी मिळते जुळते. भारतातल्या कम्युनिस्टांनी त्या गाण्यातील “चलेंगे साथ साथ” ही ओळ लोकप्रिय केली आहे. मोदी चलाखीनं ती अमेरिकेच्या चरणी वाहू पहात आहेत. या आधी संजय गांधी यांनी ते गाणं हायजॅक केलं होतं. लोकशाही, नागरी स्वातंत्र्य पायदळी तुडवण्यासाठी. आता मोदी ते हायजॅक करू पहात आहेत. कशासाठी?
मोदींनी आपल्या अमेरिकेतल्या सर्व भाषणांतून एक सूर कायम ठेवला होता. भारत दहशतवादात चांगला आणि वाईट असा भेद करत नाही. हे वर वर आकर्षक वाटणारे वक्तव्य मोदींनी केले केव्हा? इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या भेटीनंतर लगेचच. इस्रायल पॅलेस्टीनच्या निष्पाप जनतेची, बायकांची आणि मुलांची कत्तल करत असताना, त्याविषयी शब्द नाही. गेली साठ वर्षे त्यांना मातृभूमीपासून वंचित केलं आहे. एका बाजूला “ने मजशी ने परत मातृभूमीला” हे गाणं आळवून आळवून गायचं आणि दुसरीकडे इस्रायलची भलामण करायची. खास संघिष्ट बाणा.
ज्यासाठी मोदी अमेरिकेला गेले त्या युनोतील भाषणात नवा आशयच नव्हता. त्यातच भारतीय प्रतिनिधींच्या सभेतील वागण्यानं मिठाचा खडा पडला. त्यांना सभेचे मॅनर्स पाळता आले नाहीत, असा समज होईल अशी त्यांची वर्तणूक झाल्याचे वृत्त आहे. युनोच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष युगांडाचे सॅम कुटेसा असं म्हणाल्याचं काहींनी ऐकलं, “आधी त्यांना काय करायचा तो आवाज करू द्या. त्यांनी थांबायचे सौजन्य दाखवायला हवे, पण बहुधा भारतीय स्वत:ला . . . समजत असावेत.” हे शब्द छापायला वृत्तपत्र धजावले नसावे.
अनेक वृत्रपत्रांनी दोन्ही देशांतील करारांचं जे वृत्त दिलं आहे, त्यातून जुन्या करारांची फक्त “किराणा मालाची” यादी सोडून फारसं काहीच नाही, असा सूर आहे. जुन्या करारात काही “प्रगती दिसत नाही”, अथवा “दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यातही फारशी प्रगती नाही.”
आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. भारत सरकार अमेरिकेकडून हल्ला करणारे हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. त्यामुळे आता गेल्या पाच वर्षात रशियाला मागं टाकून अमेरिका भारताचा सर्वात मोठा लष्करी पुरवठादार झाला आहे. तसेच, भारत हा इस्रायली लष्करी साहित्याचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. लष्करी साहित्याच्या व्यापारातून मिळालेला पैसा इस्रायल पॅलेस्टिनींची कत्तल करण्यासाठी वापरतो, हे आता गुपीत राहिलेले नाही. म्हणजे भारत त्या कत्तलीला रसद पुरवायचेच काम करत आहे!
या भेटीत मोदींनी चलाखीनं एक ध चा मा केला आहे. लाल किल्ल्यावरील भाषणात त्यांनी “मेड इन इंडिया“ची घोषणा दिली होती. आता अमेरिकेत जाऊन ड चा क करत “मेक इन इंडिया” केली आहे. “मेड इन इंडिया” या घोषणेत देशातील औद्योगिक उत्पादनाचा विस्तार करायचा उद्देश आहे. “मेक इन इंडिया“त बाहेरच्या भांडवलदारांना परकीय गुंतवणूक करायचं निमंत्रण आहे. आता परकीय भांडवलदारांना भारताचा विकास करण्यापेक्षा नफा कमावण्यातच जास्त रस असणार, हे उघड आहे. परदेशातले सट्टेबाज भांडवल आले तरी त्याला पायघड्या घालू असे त्यात आश्वासन आहे. एफ डी आय ला रेड टेप नाही तर रेड कार्पेट घातली आहे, अशी भलामण भारतातल्या वृत्तपत्रांनी केली आहे. परदेशी भांडवलदारांच्या नफेखोरीसाठी भारतीय बाजारपेठ, संसाधनं आणि स्वस्त मजूर खुलं केल्यानं भारतीय जनतेच्या हालअपेष्टा वाढणारच.
थोडक्यात, पंतप्रधान मोदींच्या या भेटीतून भारत अमेरिकन साम्राज्यवादाचा दुय्यम भागीदार म्हणून काम करण्याची प्रक्रिया जास्तच बळकट झाली आहे. आजवर भारतानं आंतरराष्ट्रीय राजकारणात तटस्थ भूमिका सांभाळत एक प्रतिष्ठा प्राप्त केली होती. त्यावर आता विपरित परिणाम होणार आहे. अमेरिकेचे सामरिक हितसंबंध जोपासण्यासाठी शेजारी देशांशी संबंध बिघडवण्याची गरज नाही. अर्थात, भारतीय जनता देशाचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांना नख लागू देनार नाही. शीतयुद्धानंतर जगात बहुध्रुवीय व्यवस्था निर्माण होण्यासाठी भारताच्या स्वतंत्र भूमिकेला महत्त्वाचे स्थान अहे. मोदींच्या या अमेरिका भेटीने भारताला अमेरिकेच्या जगाला एकध्रुवीय प्रभुत्वाखाली नेण्याच्या कारस्थानात ढकलण्याचे प्रयत्न आणखी वेगवान होण्याची भीती आहे. हे कारस्थान यशस्वी होऊ देता कामा नये.
(संपादकीय, पीपल्स डेमॉक्रसी, ५ ऑक्टोबे, २०१४; अनुवाद: डॉ. उदय नारकर)